Monday, 30 December 2013

गुरुकुलचे समन्वयक मा. श्री. गाढवे सी.टी यांची विद्यालयास भेट....


श्रीराम विद्यालयामध्ये गेले ५ महिन्यांपासून रयत शिक्षण संस्था सातारा, कर्मवीर विद्या प्रबोधिनी अंतर्गत  ५ वी व ८ वी च्या विद्यार्थ्यांसाठी सुरु असलेल्या  "अनिवासी गुरुकुल प्रकल्प" कामकाजाच्या पाहणीसाठी न्यू इंग्लिश स्कूल वडगाव मावळ चे माजी प्राचार्य व समन्वयक म.श्री. गाढवे सी.टी. सर यांनी भेट देऊन कामकाजाची पाहणी केली.
       

Saturday, 31 August 2013

शाळेमध्ये १५ ऑगस्ट स्वातंत्रदिन साजरा....

दिनांक : १५ ऑगस्ट २०१३

१५ ऑगस्ट १९४७ या दिवशी, भारत ब्रिटीशांच्या जोखड्यापासून स्वतंत्र झाला. प्रतिवर्ष, १५ ऑगस्ट हा दिवस भारताचा स्वातंत्र्यदिन म्हणून साजरा करण्यात येतो. हे राष्ट्रीय पर्व संपूर्ण देशभरात अमाप उत्साहात साजरा केले जाते.

        कोणत्याही देशासाठी स्वातंत्र्यदिन म्हणजे एक अभिमानाचा आणि गौरवाचा दिवस असतो. या विशेष पर्वणीला, जुलमी ब्रिटिश राजवटीच्या पंज्यापासून मातृभूमीला स्वतंत्र करण्यासाठी जीवाचे रान करणाऱ्या आणि आयुष्य वेचणाऱ्या स्वातंत्र्य सैनिकांना आदरांजली वाहिली जाते. सर्वप्रथम व्यापारासाठी म्हणून आलेल्या ब्रिटिशांनी टप्प्याटप्प्याने संपूर्ण  भारताचे शासन काबीज केले.

        १५ ऑगस्ट १९४७ च्या मध्यरात्रीच्या ठोक्यावर भारताने ब्रिटिश राजवटीच्या  शृंखला  तोडून स्वातंत्र्य मिळवले. ती सबंध देशभरासाठी उत्सवाची रात्र ठरली.

        १५ ऑगस्ट म्हणजेच भारताने स्वातंत्र्य मिळवलेल्या दिवशी देशभर ध्वजारोहण आणि इतर सांस्कृतिक कार्यक्रम ठेवून स्वातंत्र्यदिन साजरे केले जातात.  दिल्लीच्या लाल किल्ल्यावर  प्रमुख कार्यक्रम असतो. तेथे पंतप्रधानांच्या हस्ते ध्वजारोहण होते आणि तोफांनी ध्वजाला सलामी दिली जाते. शाळेतही ध्वजारोहण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो त्याचीच काही छायाचित्रे :-


Friday, 30 August 2013

तालुकास्तरीय हॉलीबॉल क्रीडास्पर्धेत विद्यार्थ्यांचे यश...


२१/८/२०१३:-

तालुकास्तरीय हॉलीबॉल स्पर्धेमध्ये १४ वर्षाखालील गटामध्ये पिंपळगाव खडकी येथील श्रीराम विद्यालयातील मुलांनी शिनोली विद्यालयाच्या विद्यार्थ्यांच्या विरुद्ध फायनल मध्ये प्रथम क्रमांक पटकावला.
 त्याच प्रमाणे १७ वर्षाखालील  मुले फायनल मध्ये दाखल  झाले असून त्यांची उद्या दिनांक २२ ऑगस्ट २०१३ रोजी अण्णासाहेब आवटे महाविद्यालयाच्या प्रांगणात फायनल मॅच उर्दू हायस्कूल मंचर गटा समवेत होणार आहे.


श्रीराम विद्यालय शाळा जागा मोजणी ...

16 ऑगस्ट २०१३
श्रीराम विद्यालय पिंपळगाव खडकी शाळेचे नूतन इमारत बांधणे काम लवकरच होणार असल्याने शाळेच्या आवारातील संस्थेची जागा  सात बाराच्या त्या वेळेस करून दिलेल्या जागा मोजणीच्या नकाशावरून परत तब्बल ३५ वर्षांनी पुन्हा मोजणी करण्यात  आली.
                 १९६६ ते १९६७ च्या सुमारास बांधलेली ही शाळा ज्या वेळी संस्थेची येथे शाखा सुरु करण्याचे ठरले त्यावेळेसचे पहिले मुख्याध्यापक मा. श्री. खोबरे सर यांच्या प्रयत्नातून तब्बल ७ एकर जमिनी गावाने संस्थेला श्रीराम विद्यामंदिरच्या  नावे दान केली. त्यानंतर इमारतीची अत्यंत दुरावस्था झाल्यामुळे  त्याचे बांधकाम व्हावे या दृष्टीकोनातून ग्रामस्थांनी व विद्यार्थी पालकांनी नवीन इमारत बांधणीचा प्रस्तावमांडला.
                  अणासाहेब आवटे महाविद्यालयात नुकतीच महाराष्ट्रराज्य विधान परिषदेचे सदस्य ना. श्री. दिलीपरावजी वळसे पाटील यांनी शाळेसाठी संस्थेला ५० % रक्कम देण्याचे घोषित केले. ५० % रक्कम गावाने गोळा करावी असे ठरले. त्यामुळे जमिनीप्रमाणे गावाने इमारत बांधणीच्या या महान कार्यात सढळ हाताने मदत करून एक प्रशस्त, मोठी आणि दिमाखेदार वास्तू बनवून दाखवावी हीच अपेक्षा...

                  

Wednesday, 21 August 2013

विद्यार्थ्यांना आता प्रोजेक्टरवर मार्गदर्शन ...


आजकाल सर्वत्र तंत्रज्ञानाचे वारे वाहू लागले आहे. शैक्षणिक क्षेत्रात सुद्धा गेल्या काही वर्षात कमालीची प्रगती, बदल झाले आहे. डिजिटल क्लासेस ही त्यातलीच एक पद्धत विद्यार्थ्याना प्रोजेक्टरच्या माध्यमातून अॅनिमेशन, प्रेसेंटेशन स्लाईडचा वापर करून शिकविणे. शिवाय वेळप्रसंगी संबंधित विषयाची व्हिडिओ क्लीप्च्या माध्यमातून ज्ञानदान करणे ही जणू काही नवीन ट्रेंडच होऊ पाहत आहे.
    यामुळे मुलांना विषय अतिशय जवळून कळतो. उत्तम प्रेसेंटेशन व व्हिडीओ क्लीप्च्या सादरीकरणामुळे विद्यार्थ्याला संबंधित विषयाचे सखोल ज्ञान प्राप्त होते.  श्रीराम विद्यालयामध्ये सुद्धा असेच काहीसे वातावरण निर्माण झाले आहे.
        महाराष्ट्र शासनाच्या आय. सी.टी. च्या संगणक प्रयोगशाळेमुळे विद्यार्थ्यांना प्रोजेक्टर वर मोफत प्रशिक्षण मिळू लागले आहे. याच प्रशिक्षणाची काही क्षणचित्रे खालीलप्रमाणे:
मा.श्री.डी.एस.कुलकर्णी यांच्या "तुम्ही बी घडणा " या व्याख्यानाची चित्रफित रंगून पाहताना विद्यार्थी

मा.श्री.डी.एस.कुलकर्णी यांच्या "तुम्ही बी घडणा " या व्याख्यानाची चित्रफित रंगून पाहताना विद्यार्थी

श्रीमती वैशाली खुडे मॅडम यांनी "पचनसंस्थेचे कार्य यावर " अॅनिमेशन क्लीप्च्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिकविले.

मा.श्री. बारवे सर गुरुजी मल्टीमिडीया  सॉफटवेअरच्या सहाय्याने विज्ञान विषय शिकविताना

मा.सौ. गाडे मॅडम मुलांना  ERA प्रणालीवर संगणक शिकविताना

इंटरनेट चा वापर व आय.सी.टी. विषयाची पार्श्वभूमी समजावून सांगताना बारवे सर

पावरपॉईंट व गुरुजी मल्टीमिडीयाच्या माध्यमातून विद्यार्थी ज्ञानार्जन करताना....

सुरु झाली साफसफाई....

श्रावणमासी हर्ष मानसी , हिरवळ दाटे चोहीकडे !!
    पावसाळ्यात हमखास पाहायला मिळणारे हे दृश्य त्यात शाळेमध्ये मैदानाच मैदान त्यामुळे सर्वत्र या दिवसात हिरवळच हिरवळ दाटते. याच भूमिकेतून विद्यार्थ्यांनी मैदानात वाढलेले गवत, कॉंग्रेस आदी बाबी खेळाच्या तसेच समाजसेवेच्या तासांमध्ये उपटून काढले अतिशय प्रामाणिकपाने आकामाचा आनंद घेत गवत काढताना विद्यार्थ्यांची टिपलेली ही छायाचित्रे.

               

राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाच्या वतीने विद्यार्थ्यांचा सत्कार


२० जुलै २०१३.
                           राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष विद्यार्थी संघटना तालुक्यातील गावोगावी ग्रामीण भागातील विविध शाळांमध्ये दौरा करीत आहे. तेथील विद्यार्थ्यांचे कौतुक करीत आहे.  यशवंत व्हा ! गुणवंत व्हा ! हा संदेश घेऊन राष्ट्रवादी कॉग्रेस पक्ष्याच्या विद्यार्थी संघाने श्रीराम विद्यालायातील शालेय परीक्षेत तसेच बोर्डाच्या परीक्षेत प्रथम क्रमांकाने यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा प्रशस्तीपत्रक व पुस्तक देवून सत्कार केला. त्या संदभाने काही छायाचित्रे-
                       

विद्यार्थ्यांसाठी पुस्तक प्रदर्शन सोहळा -

वाचाल तर वाचाल या उक्तीप्रमाणे आपल्या आयुष्यात पुस्तकांना फार महत्व आहे. वाचनाने मनाची, संस्काराची एकंदरीत विद्यार्थ्याची जडण-घडण होते. वाचन करीत असताना काय वाचावे ? आणि काय वाचु नये हे मुलांना कळावे म्हणून विद्यालयामध्ये पुस्तक प्रदर्शन मांडले गेले.
                      यामध्ये शालेय ग्रंथालयातील विविध शैक्षणिक, अवांतर, वैज्ञानिक, रंजनात्मक, अत्माबोधापर, गोष्टीची पुस्तके, आत्मकथन, सामान्य ज्ञान, या सारख्या विविध प्रकारच्या पुस्तकांचे ग्रंथांचे प्रदर्शन भरविले गेले. या प्रदर्शनास मुलांचा भरगोस प्रतिसाद मिळाला.या प्रदर्शनाचे संयोजन ग्रंथपाल सौ. क्षीरसागर यांनी केले.यास मार्गदर्शन शाळेचे मुख्याध्यापक मा.श्री. मेंगडे सर यांचे लाभले. 

गुरु पौर्णिमा- व्यासपौर्णिमा

20 july 2013
गुरु पोर्णिमा म्हणजे व्यासांची जयंती. या दिनानिमित्त शाळेतील शिक्षकांचे विद्यार्थ्यांच्या हस्ते गुलाबपुष्प व पेन देऊन सत्कार करण्यात आला. त्यानंतर विद्यार्थ्यांनी  भाषणातून त्यांचे मनोगत व्यक्त केले त्या संबधीची ही छायाचित्रे :-



गुरु पोर्णिमा विशेष एक कथा :
पूर्वी धौम्य नावाच्या मुनींचा एक आश्रम होता. तेथे त्यांचे पुष्कळ शिष्य विद्याभ्यासासाठी रहात. त्यात अरुणी नावाचा एक शिष्य होता. एकदा जोराचा पाऊस पडू लागला. जवळील ओढ्याचे पाणी शेतात जाऊ नये; म्हणून तेथे एक बांध घातला होता. त्या बांधालाही पाण्याच्या जोराने भेगा पडू लागल्या. तेव्हा गुरुदेवांनी काही शिष्यांना सांगितले, ''पाणी शेतात येऊ देऊ नका आणि पाणी आडवा.''

         अरुणी आणि काही शिष्य बांधाजवळ आले. बांधाला पडलेल्या भेगा मिटवण्यासाठी सर्वांनी प्रयत्न केले; पण पाण्याचा जोर जास्त असल्याने सर्व प्रयत्न व्यर्थ  गेले. बांधाचा मधला थोडासा भाग फुटू लागला आणि पाणी हळूहळू शेतात येऊ लागले. तेव्हा रात्र झालेली होती. आता काही उपयोग नाही; म्हणून सर्व शिष्य परत आले. दिवसभर कष्ट केल्यामुळे दमलेले सर्व जण गाढ झोपी गेले. सकाळपर्यंत पाऊस थांबला. तेव्हा सर्वांच्या लक्षात आले. अरुणी कोठेही नाही. सगळया आश्रमात शोधून शेवटी ते गुरुदेवांकडे गेले आणि म्हणाले, ''गुरुदेव, अरुणी हरवला.'' गुरुदेव म्हणाले, ''आपण शेतात जाऊन बघूया.'' सर्व शिष्य आणि धौम्यऋषी शेतात जातात. पहातात तर काय ? फुटलेल्या बांधाच्या मध्ये पाणी अडवण्यासाठी स्वत: अरुणीच तेथे आडवा झोपलेला त्यांना दिसला. हे पाहून सर्व जण थक्क झाले. रात्रभर पावसात न जेवता झोपलेल्या अरुणीविषयी सर्वांच्या मनामध्ये प्रेम निर्माण झाले. पाणी तर केव्हाच ओसरलेले होते; पण अरुणीला तेथे झोप लागलेली होती. सर्वांनी त्याच्याजवळ जाऊन त्याला उठवले. गुरुदेवांनी त्याला जवळ घेऊन प्रेमाने त्याच्या डोक्यावरून हात फिरवला. हे पाहून सर्व शिष्यांच्या डोळयांत पाणी आले.

         मुलांनो, अरुणीकडून आपण काय शिकायचे ? तर गुरूंचे आज्ञापालन करण्याची तीव्र तळमळ. गुरूंचे आज्ञापालन करण्यासाठी अरुणीने स्वत:चा विचार केला नाही; म्हणूनच तो गुरूंचा आवडता शिष्य बनला. यासाठी आपणही आपल्या गुरूंच्या चरणी प्रार्थना करूया, 'हे गुरुदेवा, आमच्यामध्येही शिष्याचा 'आज्ञापालन' हा गुण निर्माण होऊ दे.'


क्रांतिसिंह नाना पाटील यांची जयंती विद्यालयात संपन्न.

२८ जून २०१३ :
महाराष्ट्रात (प्रामुख्याने सातारा, सांगली भागात) स्वातंत्र्य चळवळीचे नेतृत्व करणारे, तसेच प्रतिसरकार हा समांतर शासनाचा एकमेवाद्वितीय प्रयोग राबवणारे लढवय्ये राजकीय कार्यकर्ते म्हणजे क्रांतिसिंह नाना पाटील होत.
नाना पाटील यांचा जन्म सांगली जिल्ह्यातील बहेबोरगाव येथे झाला. लहानपणापासूनच नानांना दणकट शरीराचे वरदान लाभले होते. म्हणूनच पुढील काळातही त्यांच्या भारदस्त व्यक्तिमत्त्वामुळेच लोक त्यांच्याकडे आकर्षित होत.
शिक्षण पूर्ण झाल्यानंतर नानांनी काही काळ तलाठी म्हणून नोकरी केली. पण समाजकारण व राजकारणाची ओढ असलेले नाना लवकरच नोकरीतून बाहेर पडले. १९३०च्या सविनय कायदेभंग चळवळीपासूनच त्यांचा स्वातंत्र्य लढ्यात सहभाग होता. स्वातंत्र्यलढा आणि बहुजन समाजाचा विकास या दोन्ही मार्गांनी त्यांचे कार्य चालू होते.

Monday, 8 July 2013

श्रीराम विद्यालयात अनिवासी गुरुकुल प्रकल्प

शनिवार २२-०६-२०१३

                    इयत्ता ५ व ८ वी साठी "अनिवासी गुरुकुल प्रकल्प" सुरु करण्यात येणार आहे त्यासंबधीच्या कार्यानिमित्त पालक-शिक्षक सविचार सभा शनिवार दिनांक- २२-६-२०१३ रोजी श्रीराम विद्यालयाच्या पिंपळगाव (ख.) च्या प्रयोगशाळेत घेण्यात आली.

चर्चा केलेल्या ठळक बाबी :
  • गुरुकुल प्रकल्पाबाबत संस्थेची भूमिका
  • गुरुकुल मधील समाविष्ट घटक, कालावधी, रोजचा वेळ  
  • विद्यार्थ्यांना होणारा फायदा
  • विद्यार्थ्याची भूमिका त्याची जबाबदारी
  • पालकांची भूमिका
  • शिक्षकांची भूमिका आणी जबाबदारी
  • पालकांचा अभिप्राय
सभेस उपस्थित पालकवर्ग
 काही क्षणचित्रे :


श्रीराम विद्यालयाचे मुख्याध्यापक "अनिवासी गुरुकुल प्रकल्पाबाबत " विचार मांडताना ;
 
पुणे जिल्हा परिषदेचे सदस्य मा.मथाजी पोखरकर यांनी   "पालकांची भूमिकेवर " प्रकाशझोत टाकला ;
 
लवकरच शाळेची नूतन इमारत उभी राहणार आहे तत्पूर्वी शाळेची पाहणी करताना जी.प.सदस्य आणि ग्रामस्थ
 
पालक "वनाजी बांगर यांनी पालकांच्या नकळत होत असणाऱ्या चुका, टीव्हीवर नको त्या मालिका पाहणे, मुलांना नको ते पाहण्याची सवय लावणे, घरातच अर्वाच भाषेत संवाद साधणे, या सर्वांचा मुलांवर होणारा परिणाम नमूद केला.  ";

 

प्राथमिक शाळेतून माध्यमिक शाळेत प्रवेश घेणाऱ्या पाचवीच्या मुलांचा सत्कार......

17 JUNE 2013

पिंपळगाव आणि पिंपळगाव पंचक्रोशीतील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतून  चौथीचे इयत्तेतून पास होऊन विद्यार्थी पाचवीमध्ये आले. तेव्हा त्या पाचवीच्या विद्यार्थ्यांचे स्वागत गुलाबपुष्प देऊन श्रीराम विद्यालयाचे नवनिर्वाचित मुख्याध्यापक मा.श्री. सुर्यकांत मेंगडे सर तसेच विद्यालयाच्या समस्त कर्मचारी वृंदानी केले. त्या संबधीची काही क्षणचित्रे.....

Sunday, 24 March 2013

श्रीराम विद्यालयाची सुरु झाली वेबसाईट.....

                            आजचे युग हे तंत्रज्ञानाचे युग मानले जाते...... या युगात जो थांबला तो संपला.... आणि म्हणूनच या तंत्रज्ञानात पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील  पिंपळगाव (खडकी) या गावामधील रयत शिक्षण संस्थेच्या श्रीराम विद्यालयाने शाळेची छोटीशी वेबसाईट बनवून या तंत्रज्ञानाच्या युगात जोमाने पाऊल टाकले आहे.

        या वेबसाईट मध्ये विद्यालयाची थोडक्यात माहिती, विद्यालयाला लाभलेला परिसर, त्याच्या इमारतीचा फोटो, थोडक्यात विद्यालयातील सुविधा, विद्यालयातील असणारे विद्यार्थी, जातनिहाय विद्यार्थी संख्या, शालेय कर्मचारीवर्ग यांचे फोटोसहीत नोंद, शिवाय शाळेमध्ये होणाऱ्या घडामोडींची रीतसर ऑनलाईन नोंद येथे केली जाणार आहे.
        या शाळेचे मुख्याध्यापक मा.श्री. डी.टी. तोडकर यांनी नमूद केले कि, शाळेमध्ये विविध कार्यक्रम घेतले जातात. समाजाला त्याची कल्पना असू द्यावी म्हणून प्रेस नोटही दिली जाते. परंतु प्रत्येक वेळेस बातम्या येणे हि अशक्यप्राय गोष्ट आहे. मान्यवर आल्यानंतर  नेमक्या वेळी संकलन केलेल्या माहिती पत्रकांची फाईल गहाळ होते.  त्यामुळे वेबसाईट हि संकल्पना नक्कीच कौतुकास्पद वाटली. जास्तीत जास्त माहिती टाकून याला जबरदस्त स्वरूप आणण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. आपणाला नक्कीच हि संकल्पना आवडेल.